इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अलिबागः अजितदादा भेकड असल्याची शरद पवार गटाची टीका जिव्हारी लागल्याने त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजितदादांसमोरच शरद पवार गटाबाबत संताप व्यक्त केला. खा. सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी कडवट टीका केली. अजितदादा, छगन भुजबळ व माझ्यावर आरोप झाले, त्या वेळी पक्षाने पाठराखण केली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत येथे सुरू असलेल्या अधिवेशनात बोलताना शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावरच्या सुनावणीदरम्यान अजित पवार यांचे पक्षसंघटनेसाठी योगदान नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. तसेच ते भेकड असल्याची टीका करण्यात आली. त्याचा संदर्भ देऊन तटकरे म्हणाले, की अजितादादा भेकड असल्याच्या शब्दाने तुमचे रक्त खवळले पाहिजे. अजितदादा जर भेकड असते ,तर सरकारमध्ये सहभागी होण्याची हिंमत दाखवू शकले नसते.
पहाटेच्या शपथविधीच्या वेळीही अजितदादांबद्दल संशयाचे मळभ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून तटकरे म्हणाले, की पाच जुलै रोजी एमईटी येथे झालेल्या मेळाव्यात अजितदादांनी आपली भूमिका जाहीर केल्याने ते मळभ दूर झाले.