इंडिया दर्पण वृत्तसेवा
केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॅा. भारती पवार यांच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात १०० हून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी पदाचे राजीनामे दिल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टी नाशिक ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांची नियुक्तीला विरोध करत हे राजीनामे देण्यात आले आहे. दोन महिन्यापूर्वी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या या नियुक्तीवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी हे राजीनामे दिले.
कळवण – सुरगाणा, देवळा -चांदवड, निफाड, येवला, नांदगाव या विधानसभा मतदार संघातील काही कार्यकर्ते या नियुक्तीवर नाराजी आहे. त्याचेच पदसाद उमटले.
रविवारी नांदगाव येथे भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते व बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात हे पदाचे राजीनामे दिले आहे. भाजपा नाशिक जिल्ह्याचे नेते दत्तराज छाजेड यांनी याअगोदरच भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जिल्ह्यात त्यांचे पडसाद उमटले. त्यानंतर जिल्ह्यातून अनेक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला.
रविवारी नांदगाव येथे छत्रपती संभाजीनगर रोड येथील श्री सप्तश्रूंगी हॉलमध्ये हे नाराज कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी सर्व प्रथम पक्षाचे ध्वज च पूजन करून व सर्व पूजनीय महापुरुष व भाजपाचे संस्थापक व नेते यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्वांनी नाशिक जिल्हा कार्यकारणी व मंडळ अध्यक्ष निवडीत झालेल्या अनपेक्षित निवड तसेच निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आले याबद्दल सर्वांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यानंतर आपापल्या पदांचा राजीनामा दिला. यावेळी नाशिक ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांच्या राजीनाम्याची सर्वानुमते एक मुखाने मागणी करण्यात आली.
यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा विजय असो व पक्ष आमचा परिवार आहे. आम्ही पदाचा राजीनामा दिला आहे पक्षाचे सदस्य व कार्यकर्ताचा नाही. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून शेवटच्या श्वासा पर्यन्त पक्षाशी बांधिल राहू असे प्रतिपादन यावेळी या पदाधिका-यांनी केले.