इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना – मनोज जरांगे पाटील यांचा उद्यापासून दौऱ्याचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. या चौथ्या दौ-यात ते खान्देशसह विदर्भातील गावांना भेटी देणार आहे. महाराष्ट्राच्या तिसऱ्या दौऱ्याची सांगता करून जरांगे पाटील अंतरवाली सराटी या आपल्या गावात परतल्यानंतर आता त्यांचा हा चौथा टप्पा सुरु होणार आहे. १ डिसेंबरला जालन्यात भव्य सभाही होणार आहे.
संपूर्ण राज्याने मला माय बापाची माया दिली. आरक्षण मिळेपर्यंत मी कुटुंबाला भेटणार नाही. घरचा उंबरा चढणार नाही, असा निर्धार मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी लोक प्रेमापोटी माझ्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करतात. यांच्या का पोटात दुखते, अशा शब्दांत छगन भुजबळ यांच्यावर टीका करून ते म्हणाले, की माझ्यावर बोलण्याऐवजी आरक्षणावर बोला. कोणाचा तरी जीव गेलाय, घर उघड्यावर आले त्याबाबत बोला.
बिहारमध्ये जशी आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण दिले, तसे करून आरक्षण द्या. आम्हाला दगाफटका करू नका, असा इशारा देऊन जरांगे पाटील म्हणाले, की कुणाला डावलून आम्हाला आरक्षण नको. ओबीसीमध्ये आरक्षण देवून टक्का वाढवा. इतक्या वर्षांचा अन्याय दूर करा. २४ डिसेंबरपर्यंत सरकारने वेळ घेतला आहे. २२ डिसेंबरला अधिवेशन संपणार आहे. कायदा मंजूर करण्यासाठी २९ डिसेंबरपर्यंत अधिवेशन सुरू ठेवावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.