नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून छगन भुजबळ मांडत असलेल्या भूमिकेवरुन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधत त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले की, विखे आमचे मित्र आहे. त्यांना राजीनामा घ्यायचा असेल तर त्यांच्या नेत्यांना सांगाव, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सांगावं राजीनामा घ्यायला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विखे पाटील यांनी दिलेल्या सल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसीचा मुद्दापुढे करून आंदोलन करण्याची गरज नाही. ओबीसी विरुद्ध मराठा सुरू असलेला वाद निरर्थक आहे. भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर येऊन बोलले पाहिजे. अन्यथा सरकारमध्ये एक वाक्यता नाही असा संदेश जातो. त्यामुळे सरकार बाबतची विश्वासार्हता कमी होते.
भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्याबाबत सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. त्यांच्याकडून अशी अपेक्षा अजिबात नाही, असे सांगून विखे पाटील म्हणाले, की मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणतेही आरक्षण कमी न करता आपण मराठा समाजासाठी आरक्षण देण्यात येणार आहे. असे असताना भुजबळ यांना वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही. त्यावर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.