इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य करतांना अनेक जणांना त्याचे भान नसते. त्यामुळे कधी कधी त्यांच्याविरुध्द मर्यादा सोडून बोलणे महागात पडते. असाच प्रकार मुंबईत घडला असून माजी महापौरांना थेट अटकच झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली व नंतर न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली. त्यांची जामीनावर सुटका होईल. पण, हा सर्वांना धडा असेल.
ही घटना घडली ती मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या बाबतीत. दळवी हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आहेत. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर दळवी यांना अटक करण्यात आली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पोलिस ठाण्यात दाखल झाले. भांडुप पोलिस ठाण्याबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यानंतर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भांडूपमध्ये रविवारी ठाकरे गटाचा मेळावा होता. या मेळाव्यात दळवी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरले होते.
शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून दळवी यांनी शिवीगाळ केली. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यावरून शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले.