नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात केंद्र शासनाचे डिफेन्स पार्क व्हावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून खा.गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश येवू लागले आहे.खासदार गोडसे यांच्या मागणीची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विशेष दखल घेतली आहे. डिफेन्स पार्क उभारण्यासाठी नाशिक हे उत्तम शहर असून त्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या पायाभूत सोयी -सुविधा नाशिक येथे उपलब्ध असल्याने या ठिकाणी डिफेन्स पार्क उभारण्यात यावे यासाठीची शिफारस आज राज्य शासनाने केंद्र शासनाकडे केली आहे. डिफेन्स पार्क उभारण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस केल्याने पार्क उभारणीच्या प्रस्तावाचा पहिला आणि महत्वपूर्ण टप्पा पार केल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.
राज्यात डिफेन्स पार्क उभारण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचारधन आहे. डिफेन्स पार्क उभारण्यासाठी नाशिक हे उत्तम शहर असून या ठिकाणी डिफेन्स पार्क उभारण्यात यावा यासाठी गेले काही महिन्यांपासून खा. गोडसे शासनाकडे प्रयत्न करत आहेत. नाशिक शहर आणि परिसरात स्कूल ऑफ आर्टिलरी, एअर फोर्स स्टेशन ,हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि इतर सुरक्षा संबंधित केंद्रीय आणि राज्यसंस्था आहेत.नासिक हे आधीच संरक्षण संबंधित उपक्रमांचे केंद्र आहे. यामुळे नाशिक येथेच डिफेन्स पार्क उभारण्याकामी राज्य शासनाने केंद्राकडे शिफारस करण्यासाठी खा.गोडसे यांच्याकडून सततचा पाठपुरावा सुरू होता.
मागील महिन्यात खा.गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची मुंबईत भेट घेत डिफेन्स पार्क उभारण्यासाठी नाशिक शहर कसे उपयुक्त आहे हे त्यांच्या लक्षात आणून दिले होते.केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी डिफेन्स इनोव्हेशन हबची घोषणा केलेली असून हब स्थापनेची प्रक्रिया सुरू झाल्याचे खासदार गोडसे यांनी नामदार उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून देत डिफेन्स पार्कसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या पायाभूत सोयीसुविधा नासिक येथे उपलब्ध असल्याची माहिती दिली होती.खासदार गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने उद्योग मंत्री नामदार सामंत यांनी त्यांच्या मागणीची विशेष दखल घेत डिफेन्स पार्क नाशिक येथे उभारण्यात यावे अशी शिफारस आज राज्य शासनाने केंद्रिय वाणिज्य,उद्योग मंत्री ना.पियुश गोयल आणि संरक्षणमंत्री ना.राजनाथ सिंग यांच्याकडे केली आहे.