मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. आज विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार,मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य,विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशन गुरुवार ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार२० डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण दिवस १४ (सुट्ट्यासह) प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, सुट्या(शनिवार व रविवार) ४ दिवस.
अधिवेशनात पडणार घोषणांचा पाऊस
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदरचे हे अधिवेशन असल्याने तसेच या अधिवेशनावर अनेक मोर्चे येणार असल्याने विविध घटकांचे समाधान करण्यासाठी सरकार घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विविध समाज घटक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. सध्या राज्यात आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाजाला सरकारने आरक्षणाबाबत दिलेली आश्वासनाची मुदत याच काळात संपत आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. मराठा समाजाबरोबरच इतर समाजाला डोळ्यासमोर ठेवून येत्या हिवाळी अधिवेशनात घोषणांची बरसात होण्याची शक्यता आहे.
हे विषय कळीचे
हिवाळी अधिवेशनात नाशिक-पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, गारपीट व अतिवृष्टीने झालेले नुकसान, शेतकऱ्यांना अजून न मिळालेली भरपाई, दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.