नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य मंत्रालय उत्तर चीनमधील H9N2 चा प्रादुर्भाव आणि मुलांमधील वाढत्या श्वसन आजाराच्या प्रकरणांवर बारीक लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये आढळललेले एव्हीयन इन्फ्लूएन्झा प्रकरण तसेच श्वसनाच्या आजारापासून भारताला कमी धोका असला तरी दक्षता घेण्यात येत आहे. केंद्राने आता राज्य शासनाही सुचना जारी केल्या आहे. त्या सूचनेनुसार आता राज्य सरकारही ॲलर्ट मोडवर आले आहे. प्रत्येक जिल्ह्याला सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोनासारखी परिस्थिती उद्भवू नये, त्यासाठी तयारी सुरू केली आहे.
केंद्र सरकारच्या पत्रानंतर राज्यातील आरोग्य विभाग ॲक्टिव्ह मोडवर आला आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी आवश्यक मनुष्यबळ, प्रयोगशाळाची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. चीनमधील लहान मुलांमध्ये न्यूमोनिया होण्याचे कारण प्रामुख्याने इन्फ्युएन्झा, मायकोप्लाझा आणि सार्स कोव्हिड-१९ आहे. अजून धोका नसला, तरी काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सर्व जिल्ह्यांमध्ये कोव्हिड खाटांची तयारी, ऑक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटर उपलब्धता, मनुष्यबळ तयारी, ऑक्सिजन प्लांट, सिलेंडर कार्यान्वित आहेत की नाही याची खातिरजमा करण्याचे आदेश दिले आहेत. सार्स सर्व्हेक्षणातील रुग्णांचे नमुने प्रयोगशाळांना पाठवावे, काही जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. औषधसाठा आणि इतर साधनसामग्री उपलब्ध आहे की नाही याची तपासणी करा, ‘क्लस्टरींग ऑफ केसेस’ आहे की नाही याची खातरजमा करा तसेच श्वसन संसर्ग असलेल्या रुग्णांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मृत्यूचे प्रमाण कमी
चीनमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये H9N2 (एव्हियन इन्फ्लूएन्झा विषाणू) चा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचे आढळून आल्यानंतर देशात एव्हीयन इन्फ्लूएंझाच्या मानवी प्रकरणांविरूद्धच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती ज्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला होता. आरोग्य संघटनेने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात त्यांच्याकडे आतापर्यंत नोंदवलेल्या H9N2 च्या मानवी प्रकरणांमध्ये मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्याकडे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असून मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे.