पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वेतील जेवणावरुन अनेक तक्रारी आहे. त्या तक्रारीकडे रेल्वेने कधीच गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे ब-याच वेळा आता प्रवासी हे घरुनच डब्बा करुन घेऊन जातात. पण, तरी ज्यांच्याकडे वेळ नसतो त्यांना रेल्वेतील डब्बे खाण्याशिवाय पर्याय नसतो. पण, हे जेवण एखाद्या वेळेस जीवघेणे सुध्दा ठरु शकते. असाच प्रकार चेन्नईवरून पुण्याकडे येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये झाला. या रेल्वेतील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहे.
मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. रात्री जेवण करून झोपलेल्या प्रवाशांना त्रास होऊ लागला. त्यामुळे या प्रवाशांवर औषधोपचार करण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने व्यवस्था करण्यात आली. सर्व ४० प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
भारत गौरव रेल्वेतील प्रवाशांना रेल्वेतील भोजन घेतल्यानंतर प्रवाशांना हा त्रास झाला. मध्यरात्रीच्या सुमारास ही रेल्वेगाडी पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाली. पुणे रेल्वे स्थानकातच सर्व प्रवाशांना उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथक तैनात ठेवले होते. रेल्वे स्थानकावर डॉक्टरांची टीम सज्ज होती. ससूनमध्ये प्रवाशांसाठी ४० बेड तयार ठेवले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना प्रवाशांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.