मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड रेल्वे ओव्हर ब्रीजवरील येवल्याच्या दिशेने जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणावर खचल्याने इंदूर-मनमाड-पुणे या राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. काही वाहने पुलावरच अडकली असून त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, अनेक वर्षाचा हा पुल असल्याने तो जीर्ण झाला होता.
मनमाड शहराच्या दोन भागांना जोडणारा हा पुल आहे. सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून सध्या पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान येवल्याकडून मनमाडकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली असून मालेगावकडे जाणारी वाहतूक आता येवला-नांदगाव मार्गे वळविण्यात आली आहे.
मनमाड शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला इंदौर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन हा पुल आहे. या पुलाची मुदत संपली असल्यानं त्याचं मागेच स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं. मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नव्हती. आज पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान या पुलाच्या पूर्वेकडील मोठा कठडा कोसळला. यामुळे मातीचा भराव असलेला मोठा भाग सुरक्षा कठड्यासहित कोसळला. यावेळी कोणत्याही प्रकारचे वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली.