इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ज्या शिक्षकांचा आदर्श सर्वांसमोर असतो. त्याच शिक्षकाने आपल्या पत्नी व लहानग्या मुलांची हत्या करुन स्वतः आत्महत्या केली. ही घटना
बार्शी शहरात उपळाई रोडवर घडली. या हत्याकांडामुळे शैक्षणिक वर्तूळाबरोबरच बार्शी शहरात खळबळ उडाली आहे. शिक्षकांनी केलेल्या या कृत्याचा सर्वांनाच धक्का बसला.
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले अतुल मुंडे यांनी हे हत्याकांड केले आहे. त्याने प्रथम शिक्षिका असलेली पत्नी तृप्ती मुंडेचा गळा कापला त्यानंतर पाच वर्षाचा मुलगा ओम मुंडे तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली
बार्शीतील उपळाई रोडवर हे मुंडे कुटुंबिय राहत होते. वरच्या मजल्यावर दोघे पती पत्नी तर खालच्या मजल्यावर त्यांचे आई-वडील राहत होते. पत्नी तृप्ती या बार्शीतील एका शाळेत शिकवत होत्या. या घटनेमागील कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासला सुरुवात केली आहे.