नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, सिल्कयारा बोगद्याचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या ४१ मजुरांची यशस्वीपणे सुटका करण्यात आल्यामुळे त्यांना पूर्ण दिलासा मिळाला आहे आणि आनंद झाला आहे.
एका पोस्टमध्ये गडकरी म्हणाले की, अनेक संस्थांनी संघटितपणे केलेला हा प्रयत्न अलिकडच्या काही वर्षांमधील सर्वात लक्षणीय बचाव कार्यांपैकी एक आहे. अनेक आव्हानांना तोंड देत विविध विभाग आणि संस्थांनी एकमेकांना पूरक काम केल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे, तसेच सर्वांच्या प्रार्थनांमुळे हे ऑपरेशन सफल ठरले, असेही ते म्हणाले.
गडकरी म्हणाले की, बचाव पथकांच्या समर्पित प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले. या बचाव कार्यात सहभागी झालेली प्रत्येक संस्था आणि व्यक्ती प्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. केंद्रीय मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय बचाव तज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि उत्तराखंड सरकारच्या जलद आणि प्रभावी प्रतिसादाची प्रशंसा केली.