मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातील महत्त्वाच्या शहरात ‘पिंक रिक्षा’ ही योजना लवकरच सुरू करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेताना मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखड, सह आयुक्त राहुल मोरे यावेळी उपस्थित होते.
मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. यामध्ये लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य देणे, बँका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ही योजना सूरू करणार असून प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या ठिकाणी ही सुरू करण्याचा मानस आहे.
महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांशी समन्वय साधून गरजू लाभार्थी निवड निकष तपासून ही देखील योजना यशस्वीपणे राज्यात राबवावी. महिला व बालविकास विभागाने शाळा, महाविद्यालये, गरीब व गरजू लाभार्थी महिला निवड यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून शेवटच्या घटकातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्याबाबत चोखपणे योजना राबवावी, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.








