नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या विकासासाठी आणि भविष्यात उद्भवणऱ्या भिषण वाहतुकीच्या कोंडीवर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेला निओ मेट्रो प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासुन अंतिम मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे. सदर प्रकल्प शहरासाठी अत्यंत गरजेचा असून प्रकल्पातील अडीअडचणींवर चर्चेद्वारे मार्ग काढण्यासाठी प्रकल्पाच्या संबंधित सर्व विभागांची एकत्रित बैठक मंत्रालयात आयोजित करावी अशी आग्रही मागणी खासदार गोडसे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नाशिक शहर आणि परिसरात भविश्यात होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून खा. गोडसे यांनी शहरात मेट्रो व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहे. निओ मेट्रो प्रकल्पाला सन 2019 साली महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. पुढील मान्यतेसाठी राज्य शासनाने प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला आहे. निओ मेट्रोसाठी मुंबई – नाका, सीबीएस, अशोक स्तंभ, गंगापुर आणि गंगापुर सातपुर एमआयडीसी, त्र्यंबकरोड, सीबीएस अशा दोनी मार्गिका असणार असून सीबीएस ते नाशिकरोड रेल्वे स्थानकापर्यंत सिंगल मार्गिका असणार आहे. केंद्र शासनाकडून या प्रस्तावाला आता फक्त अंतिम मंजुरी मिळणेच बाकी आहे.
केंद्र शासनाने राज्य शासनाकडून आलेल्या या प्रस्तावाची सविस्तर स्कूटनी करून आवश्यक त्या त्रुटी पुर्ण करून घेतलेल्या आहेत. परंतु वर्ष उलटुनही प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सदर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खा. गोडसे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष पत्र पाठविले आहे. मेट्रोची एकूण लांबी बत्तीस किलोमीटर होती. मधल्या काळात बत्तीसपैकी सुमारे अकरा किलोमीटरचे पहिल्या टप्प्यात काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र द्वारका ते दत्तमंदिर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे येत असल्याने आपण वाहतुकीच्या दृष्टीने डबल डेकर करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे. मेट्रोच्या प्रस्तावात राष्ट्रीय महामार्गाचा कोठेही उल्लेख नसल्याने विसंगती जाणवत आहे. मेट्रो प्रकल्प शहरासाठी अत्यंत गरजेचा असून प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित सर्व विभागांची एकत्रित बैठक मंत्रालयात आयोजित करावी अशी आग्रही मागणी खा. गोडसे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.