नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल या रिक्त पदभरतीसाठी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात येणारी परीक्षा शासन निर्देशानुसार स्थगित करण्यात आली होती. परंतू जिल्ह्यातील पेसा कार्यक्षेत्राबाहेरील पदभरतीसाठी निर्बंध नसल्याने पोलीस पाटील व कोतवाल पदांची १० डिसेंबर २०२३ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पोलीस पाटील पदासाठी निफाड उपविभागातील निफाड व सिन्नर, येवला उपविभागातील येवला व नांदगांव, मालेगाव उपविभागातील मालेगाव तालुक्यात तसेच कोतवाल पदासाठी येवला, नांदगांव, मालेगाव, निफाड, सिन्नर व चांदवड या तालुक्यातील अर्ज केलेल्या उमेदवारांना १ डिसेंबर 2023 पासून https://nashik.ppbharti.in या संकेतस्थळावर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देवून परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध करून घ्यावीत. तसेच त्याबाबत काही अडचण असल्यास संबंधित तहसिल कार्यालयस्तरावर असलेल्या मदत कक्षाकडे (Help Desk) जावून परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध करून घ्यावीत, असेही अपर जिल्हाधिकारी श्री पारधे यांनी कळविले आहे.