इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होत असलेल्या पाच सामन्याच्या मालिकेत भारताने दोन विजय मिळवल्यानंतर भारताचा तिसरा सामना आज गुवाहटी येथे होत आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास ही मालिका भारत जिंकेल. पण, भारत यामुळे विश्वविक्रमही करेल. भारतीय संघ पाकिस्तानला मागे टाकून सर्वाधिक टी २० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा संघ बनेल. एकदिवशीय सामन्यात भारताने अगोदरच अनेक विक्रम केले आहे. आता टी -२० मध्ये हा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
भारताने आतापर्यंत २११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी १३५ सामने जिंकले आहेत. ६६ सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला. चार सामने बरोबरीत सुटले आहेत. सहा सामने अनिर्णित राहिले. पाकिस्तानने २२६ टी-२० पैकी १३५ आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. त्याला ८२ पराभव पत्करावे लागले असून तीन सामने बरोबरीत सुटले आहेत. पाकिस्तानचे सहा सामने अनिर्णित राहिले आहेत. म्हणजेच आणखी एका विजयासह भारतीय संघ पाकिस्तानला मागे टाकेल. टायब्रेकर जिंकून भारत पुढे आहे टी-२० सामना टाय झाल्यास सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी टायब्रेकरचा वापर केला जातो. टाय झालेल्या चारही सामन्यांपैकी भारताने टायब्रेकर जिंकले आहेत. त्याचवेळी, पाकिस्तानला तीन टाय झालेल्या सामन्यांमध्ये फक्त एक टायब्रेकर जिंकता आला आहे.
टायब्रेकरमध्ये विजय जोडल्यास भारताचे १३९ आणि पाकिस्तानचे १३६ विजय आहेत. तथापि, टी२० रेकॉर्ड बुकमध्ये विजय आणि बरोबरी स्वतंत्रपणे मोजली जाते. त्यामुळे विजयांच्या संख्येत पाकिस्तानला मागे टाकण्यासाठी भारताला आणखी एक सामना जिंकावा लागेल.