मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत हा संस्कृतीचा केंद्रबिंदू असून जगभरात भारताची ओळख ही या संस्कृतीमुळे असून हा वारसा टिकविण्यात, वाढविण्यात देशातील अनेक संत महापुरुषांचा हातभार आहे. प्रत्येक कालखंडात या संतांनी या भूमीला पवित्र करण्याचे काम केले असून त्यामध्ये श्रीमद् राजचंद्रजी यांचाही समावेश आहे. श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याणाच्या मार्गातून मानवतेची सेवा केली आहे. त्यांचे मुंबईत निर्माण करण्यात आलेले स्मारक लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे उद्गार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यांनी आज येथे काढले.
भारतीय संत श्रीमद् राजचंद्रजी यांच्या 156 व्या जयंतीनिमित्त श्रीमद् राजचंद्रजी मिशन, धरमपूरच्या वतीने आयोजित आत्मकल्याण पर्व कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते चर्नी रोड स्थानकाजवळील रॉयल ऑपेरा हाऊस जवळ उभारलेल्या श्रीमद् राजचंद्र स्मारकाचे अनावरण आणि मॅथ्यूज रोडचे नामकरण श्रीमद् राजचंद्रजी मार्ग असे करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेवश्री राकेशजी, मिशनचे अध्यक्ष अभय जसाणी, उपाध्यक्ष आत्मर्पीत नेमीजी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. समारंभात उपराष्ट्रपती श्री. धनखड यांना पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या हस्ते ‘जनकल्याण हितैशी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उपराष्ट्रपती श्री. धनखड म्हणाले की, महात्मा गांधींचे अध्यात्मिक प्रेरणास्थान असलेले श्रीमद् राजचंद्रजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणे हे माझे भाग्य आहे. श्रीमद् राजचंद्रजी यांचे कार्य श्रीमद् राजचंद्रजी मिशन व त्यांचे संस्थापक गुरुदेवश्री राकेशजी अविरतपणे चालवित आहेत. प्रत्येक सजीवासाठी ही पृथ्वी आहे. फक्त मानवासाठीच नाही, ही त्यांची शिकवण असून श्रीमद् राजचंद्रजी मिशनचे पशुवैद्यकीय दवाखाना हे मानवतेचे एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या तीस वर्षांच्या आयुष्यात श्रीमद् राजचंद्रजी यांनी आपल्या कार्यातून ठसा उमटवला. मुंबईतील स्मारक आणि मार्ग यामुळे राजचंद्रजी यांची आठवण देत राहील व लोकांना प्रेरणा देत राहिल. महात्मा गांधी व सध्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर श्रीमद् राजचंद्रजी यांच्या विचारांचा प्रभाव पडला आहे.
महात्मा गांधी हे मागील शतकातील महापुरूष होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अंहिसेने इंग्रजापासून आपल्याला स्वातंत्र्य दिले. तर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला वेगळ्या प्रगतीपथावर नेऊन ठेवले, असेही उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी यावेळी सांगितले.
गुरुदेवश्री राकेशजी यांच्या आशीर्वादामुळे माझ्यात ऊर्जा निर्माण झाली असून त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे. आज सामान्य माणूस भौतिक सुखाच्या शोधात आहे. तो अस्वस्थ, चिंतेत आहे. शिक्षण,समानता आणि चांगल्या वर्तणुकीतूनच देशात बदल होऊ शकतो. जनतेने आपले आचरण कायद्यानुसार केले तर संपूर्ण जगाला बदललेला भारत दिसेल. आपली संस्कृती वाढवून आपला देश अग्रस्थानी ठेवण्यावर भर द्यावा. आपल्या भारतीयत्वावर विश्वास ठेवावा, आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा भारतीय म्हणून अभिमान बाळगावा, असेही श्री. धनखड यांनी सांगितले.
संसदेच्या सभागृहात चर्चा व विचार विनिमय होण्याऐवजी गदारोळ व कटुता निर्माण होत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना संसद सदस्यांनी गुरुदेवश्री राकेशजी यांचे प्रवचन ऐकले तर त्याचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होईल असे श्री. धनखड यांनी सांगितले.
राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, संत श्रीमद् राजचंद्र हे एक यशस्वी उद्योजक होते. एकेकाळी त्यांनी संसाराचा त्याग केला आणि आत्मकल्याण हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. गुरुदेवश्री राकेशजी यांच्या माध्यमातून ‘श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर’ हे संत राजचंद्रजींनी दाखवलेल्या मार्गावर अखंडपणे चालत आहे, त्यासाठी मिशनचे सर्व सदस्य अभिनंदनास पात्र आहेत. ‘श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर’ आणि ‘श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर’ या संस्थांच्या मानवतावादी कार्यासाठी पुरस्कार मिळाले होते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या वेळी संत जन्मले आणि अवतरले आणि इतर राज्यांतून स्थायिक झाले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, समर्थ रामदास, शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंगजी यांचे पवित्र वास्तव्यही या भूमीत होते. त्याचप्रमाणे श्रीमद राजचंद्रजी यांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी याच मुंबई शहरात ‘शतावधन’ आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. याच शहरात त्यांची महात्मा गांधींची भेट झाली. श्रीमद राजचंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वाचा महात्मा गांधींच्या जीवनावर नेहमीच प्रभाव पडला, असेही राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.
श्री. बैस म्हणाले की, जैन तत्त्वज्ञानात सांगितलेल्या अध्यात्माच्या महान तत्त्वांनी जगभरातील लोकांच्या अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे. त्याच्या अहिंसेच्या चिरस्थायी वारशाने जीवन आणि निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आकारला आहे. आज जगाला शांततेची गरज असून मानवी जीवनातून शांतता दूर होत आहे. लोक तणावग्रस्त आहेत. समुदाय अस्वस्थ आहेत, राष्ट्रे युद्धात आहेत. आज वैयक्तिक पातळीवर, समाजात आणि राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. शाश्वत शांतीसाठी बंधुत्व व सेवेची भावना आवश्यक आहे. सेवेच्या भावनेनेच खरी शांती शक्य आहे. प्रेम, करुणा आणि सामायिकरण आणि सेवेच्या भावनेद्वारे शांतता प्राप्त करू शकतो. स्वातंत्र्याच्या अमृत काळात केवळ आत्मज्ञानच माणसाला अमरत्व आणि आत्मकल्याणाचा मार्ग दाखवू शकते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविकात मिशनचे अध्यक्ष अभय जसाणी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले की, श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे सामाजिक अभियान हे मुंबई आणि महाराष्ट्रातील मानवतावादी आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. यातून बहुसंख्य नागरिकांच्या जीवनात लाभ झाला असून त्यांनी उन्नती केली आहे. श्रीमद् राजचंद्र लव अँड केअर गेल्या दोन दशकांपासून देशातील ग्रामीण भागातील पीडित लोकांना विविध आरोग्य सुविधा मोफत पुरवत आहेत. श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरच्या वतीने महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसेच उपराष्ट्रपतींचे मूळ गाव असलेल्या राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यामध्ये दोन मोठ्या मोफत वैद्यकीय शिबिराची घोषणा करण्यात आली.
असे आहे स्मारक
‘श्रीमद् राजचंद्र स्मारक’ येथे श्रीमद् राजचंद्रजींच्या जीवनाला आदरांजली वाहणारी 70 फुटांहून अधिक भव्य भित्तीचित्रे आहेत. यामध्ये त्यांच्या जीवनतील महत्त्वाच्या घटना रेखाटल्या आहेत. स्मारकात खेळाचे क्षेत्र, रेखीय उद्यान, रिफ्लेक्सोलॉजी पथ, योग प्लाझा, बोटॅनिकल गार्डन, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्ये दर्शविणारी सार्वजनिक कला समाविष्ट आहे.