मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या मेडिकल कॉलेजच्या जागेच्या आडगांव, येथील ग.नं. १०७४ /२ मधील क्षेत्र २० हेक्टर क्षेत्राचे भाडेपट्टा करारास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. या कामासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती केलेली होती. या निर्णयाची घोषणा महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे २ डिसेंबरला करणार असल्याचे बोलले जात आहे.
मौजे आडगांव ता. जि. नासिक येथील गट नंबर १०७४ ही मिळकत शासन महसुल व वन विभाग यांचेकडील ज्ञापन क्रमांक- एलआरएफ. ३०९० प्रकरण १२०१ ज ६ दिनांक २० एप्रिल १९९१ अन्वये मराठा विद्या प्रसारक समाज, नासिक या संस्थेस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी महाराष्ट्र जमीन महसुल (सरकारी जमीनीचे वितरण) नियम १९७१ च्या नियम ४, ५ व ६ अन्वये ३० वर्षाच्या भाडेपट्ट्याने नाममात्र रुपये १ दरसाल भुईभाडे आकारून वितरण करण्यांत आलेली आहे. शासन महसुल व वन विभागाने दि. २२ जून १९९० मधील अटी व शर्तीवर मंजुरीस मान्यता दिलेली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी, नाशिक यांचेकडील आदेशाने सदरहू मिळकत संस्थेला दिलेली आहे. सदरील आदेशाची कराराची मुदत असल्यामुळे संस्थेने सदरची मुदत वाढ करून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आलेली होती.
संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन बाबुराव ठाकरे यांनी याबाबत मंत्री छगन भुजबळ यांना भेटून शासनस्तरावर पाठपुरावा करून करारवाढ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत शैक्षणिक वापरासाठी असलेल्या या संस्थेचा भाडे करार वाढवून देण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या संस्थेस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी मौजे आडगांव,ता.जि.नाशिक येथील स.नं./ग.नं. १०७४ मधील क्षेत्र २०.०० हे. आर क्षेत्राच्या पुढील भाडेपट्टा करारास शासनाकडुन मुदतवाढ देण्यात आली आहे.