इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
पुणे-अहमदनगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकाजवळ स्फोटक रसायने असलेला एक गॅस टँकर पलटी झाल्याची घटना पहाटे घडली. या अपघातात टँकरमध्ये एथिलीन ऑक्साइड हे स्फोटक रसायन असल्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाची आठ वाहने घटनास्थळी तातडीने आली. त्यानंतर टँकरवर पाण्याचे फवारे मारण्यात आले.
या घटनेतील धोका लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक थांबवली. टँकर चालकास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झालेल्या टँकरमधून रिलायन्स पेट्रोकेमिकल्सच्या गॅसची वाहतूक होत होती. अपघातासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांचे पथकही घटनास्थळी आले.
एथिलीन ऑक्साइड विषारी आणि स्फोटक आहे. या वायूची गळती झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाची केमिकल इमरजन्सी टीमसुद्धा घटनास्थळी दाखल झाली.