इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनमाड जवळ कंटेनर-स्विफ्ट कारच्या धडकेत नाशिकचे ५ तरुण ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडल्यानंतर रात्री पुन्हा कन्नड घाटात एका अपघातात मालेगाव येथील चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या दोन अपघातात जिल्ह्यातील ९ जण अपघातात ठार झाले आहे.
रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. तुळजापूर अक्कलकोटवरुन देवदर्शन करुन घराकडे परतणारी भाविकांची तवेरा गाडी कन्नड घाटात कोसळल्याने हा अपघात झाला. यात चार जण ठार तर सात जण गंभीररित्या जखमी झाले आहे. गाडीतील सर्व प्रवासी मालेगाव येथील जाजूवाडीचे आहे.
या अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५), शीलाबाई प्रकाश शिर्के (६०), वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी (३५) व पूर्वा गणेश देशमुख (०८) हे मृत्युमुखी पडले तर अनुज धर्मेंद्र सूर्यवंशी (२०), जयेश धर्मेंद्र सूर्यवंशी (१७), सिद्धेश पुरुषोत्तम पवार (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (४), रूपाली गणेश देशमुख (३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (३५) व वाहन चालक अभय पोपटराव जैन (५०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघात प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार चव्हाण यांनी केली अपघातग्रस्तांना मदत
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांना फोन केला. त्यानंतर मंगेश चव्हाण यांनी या अपघातग्रस्तांना मदत केली. या घटनेची ठिकाणी पोलिसही दाखल झाले. त्यानंतर चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी जखमींना दरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मनमाड जवळ झालेल्या अपघातात ५ ठार
मनमाड जवळील अनकवाडे रेल्वे उड्डाण पुलावर कंटेनर-स्विफ्ट कारची रविवारी सायंकाळी समोरा समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ५ तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रोहित धनवटे, श्रेयस धनवटे ,ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव असून पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी आहे. मनमाडजवळच्या कुंदलगाव येथील म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उरकून येवला मार्गे नाशिककडे परतत असतांना हा भीषण अपघात झाला. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.