नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष पिकासह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदि पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पूर्व भागातील मनमाड नजीकच्या कातरवाडी येथे एक एकरवर फुलवलेली पपईची बागच गारपिटीने उदध्वस्त केली.
रविवारी परिसरात लिंबूच्या आकाराची गारपीट झाली यात कांद्याचे तर नुकसान झाले. पण, कातरवाडी येथील रामदास झाल्टे यांच्या पपईच्या बागेचे मोठे नुकसान झाले. दुष्काळी परिस्थितीत कांद्या ऐवजी पपईची लागवड त्यांनी केली. त्यासाठी सोसायटी मधून दीड ते दोन लाखाचे कर्ज घेतले. बागेला पाणी कमी पडू नये म्हणून प्रसंगी विकत पाणी आणत ती ड्रीपच्या माध्यमातून बागेला दिले.
पण, ऐन फळ काढण्याची वेळ आली असताना काल झालेल्या गारपिटीमुळे त्यांची संपूर्ण बाग उदध्वस्त झाली. यात त्यांना मिळणारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.