इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धुळे : इस लडकी को साथ मे लेके चलो म्हणत…साक्री येथे दरोडेखोरांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २३ वर्षीय तरुणीचे अपहरण केले. या घटनेतील दरोडेखोरांनी तोंडाला मास्क बांधले होते आणि ते हिंदीतून बोलत होते, असे अपहृत तरुणीच्या आत्याने सांगितले. याघटनेनंतर पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणीचे कॅाल डिटेल्स काढले. त्यावरुन तीचे सर्वाधीक संभाषण झालेल्या सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एका घरात दरोडेखोरांनी दरोडा टाकून ८८ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लुटले. घरातील तरुणीचे अपहरण केले. साक्रीतील नवापूर रस्त्यावरील भांडणे शिवारात असलेल्या सरस्वती कॉलनीतील ज्योत्स्ना पाटील (४० वर्षे) आणि त्यांची भाची निशा शेवाळे या दोघी घरात टीव्ही पाहत होत्या. त्यांना घराचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. घराचा दरवाजा उघडल्यानंतर सहा दरोडेखोरांनी दोघींना शस्त्राचा धाक दाखवला. कपाटातील तिजोरीतून सुमारे ८८ हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. तसेच ज्योत्स्ना पाटील यांचे हातपाय बांधून निशाचे अपहरण केले.
ज्योत्स्ना पाटील यांचे पती काही कामानिमित्त संगमनेर येथे गेले होते. त्यामुळे निशाला त्यांनी घरी सोबतीला बोलवले होते. निशा व ज्योत्स्ना रात्री जेवण करून गप्पा करत बसल्या असताना रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांच्या हातात बंदूक आणि चाकू होता. या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पाच पथके पोलिसांनी तयार केले असून गुजरात व मध्य प्रदेशमध्ये त्यांना पाठवले आहे.