इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेचा शरद पवार यांच्याबरोबरच फोटो शेअर करत अंतरवली सराटीतील दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? असा प्रश्न केला होता. या प्रश्नाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर देतांना हृषीकेश बदरे व निलेश राणे यांचाच फोटो शेअर करत पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे.
रविवारी राणे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते, अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? असे म्हटले आहे. या पोस्टबरोबरच त्यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता.
त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याला असे उत्तर दिले…पवार साहेबांच्या सोबतच्या एका कार्यकर्त्याचा फोटो व्हायरल करुन साहेबांवर तथ्यहीन आरोप काही निवडक लोकांकडून केले जात आहेत. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला रोज हजारो लोक येत जात असतात. फोटो काढण्यावर कोणतेही बंधन ठेवता येत नाही, ही बाब महाराष्ट्रातील जनतेला चांगलीच माहिती आहे.सोबत फोटो असल्याने जर कोणत्याही दगडफेकीला प्रोत्साहन दिले जात असेल तर या व्यक्तीचे इतरही अनेक स्थानिक नेत्यांच्या सोबत जवळकीचे फोटो आहेत. म्हणून त्यांनी या आरोपीला दगडफेक करण्यास प्रोत्साहन दिले, असे म्हणायचे का?
या उत्तरावर निलेश राणे यांनी हृषीकेश बदरे बरोबरचा फोटो शेअर करत पुन्हा उत्तर दिले… फोटो असेल पण दगडफेक झाल्यावर दुसऱ्याच दिवसाचा नाही ..तिर सही निशाने पे लगा !! राज्याच्या राजकारणात हे फोटो वॅार आता नवीन नाही. त्यामुळे एका नेत्याने फोटो टाकला की त्याला दुसरा नेता उत्तर देतो. त्यामुळे फार तर करमणूक होते. पण, प्रश्न मात्र कायम रहातो.