नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाराणसीला प्रदूषण मुक्त करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून शहरात दुसऱ्या तरंगत्या सीएनजी इंधन वायू भरणा केंद्राचे उद्घाटन आज केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते, गंगा घाट इथे झाले. इथेच देशातले, नमो घाट हे पहिले सीएनजी भरणा केंद्र उभारल्यानंतर, गंगा घाट इथे आज नौकांमध्ये भरण्यासाठी उद्घाटन झालेले सीएनजी केंद्र हे देशातले अशा प्रकारचे दुसरे केंद्र ठरले आहे.
“हे तरंगते सीएनजी केंद्र उभारण्याचा निर्णय म्हणजे स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायी वापराच्या सामर्थ्यावरील आपल्या विश्वासाचा दाखला आहे”, असे हरदीप सिंह पुरी म्हणाले. रविदास घाट इथे उभारलेल्या या सीएनजी केंद्राचे महत्व विशद करताना पुरी यांनी नमूद केले की यामुळे नौकांमध्ये वायू इंधन भरण्यासाठी नमो घाट इथे जावे लागणार नसल्याने, वेळ आणि पैसा यांची बचत होत नावाड्यांची खूप मोठी सोय होणार आहे.
अनेक वर्षांपासून, वाराणसी घाटावरील नावाडी, जुनी आणि कमी कार्यक्षमतेची पेट्रोल आणि डिझेल इंजिन वापरत आले आहेत. आता मात्र त्यांची जागा नवीन सीएनजी इंजिन, इतर आवश्यक सामुग्री संचासह घेत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नौकांची इंधन कार्यक्षमताही सुधारत आहे. आपल्या औद्योगिक सामाजिक दायित्व उपक्रमा अंतर्गत, गेल या सार्वजनिक उपक्रमातील कंपनीने वाराणसी नगर पालिके सोबत, नौकांमध्ये पर्यावरणस्नेही सीएनजी इंधनाचा वापर करता येण्याजोगे संच बसवण्यासाठी, करार केला आहे.
सीएनजी हे तुलनेने अधिक सुरक्षित आणि कमी प्रदूषण करणारे इंधन असून त्याच्या ज्वलनातून डिझेलच्या तुलनेत नायट्रस ऑक्साईड्स आणि सल्फर ऑक्साईड्स या घातक रासायनिक वायूंचे उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी होते. सीएनजीच्या ज्वलनातून डिझेलच्या तुलनेत धूर कमी प्रमाणात निघतो आणि हा धूर जवळजवळ गंधहीन असून त्यामुळे तो आरोग्याला अपायकारक ठरत नाही, तसेच नावाडी आणि त्यांच्या नौकेतून फिरणारे पर्यटक यांची मोठ्या प्रमाणात सोय होऊन पवित्र गंगा नदीतील आणि वातावरणातील प्रदूषण सुद्धा कमी होते. डिझेलच्या तुलनेत सीएनजीच्या संचामुळे नौकांची होणारी थरथर कमी होऊन त्यामुळे इंजिनाचा आवाजही कमी होतो आणि नौका जास्त हलत नाही. त्यामुळे पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटताना कंपनांचा त्रासही कमी होतो.
वाराणसी शहरात वायू इंधन पुरवठ्याची पायाभूत सुविधा उभारण्यासाठी गेल कंपनीने ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून २०२४ पर्यंत आणखी १०० कोटी रुपये, गेल खर्च करणार आहे. वाराणसीचा हा वायू इंधन वितरण प्रकल्प, प्रतिष्ठेच्या अशा प्रधानमंत्री ऊर्जा गंगा प्रकल्पाचा एक भाग असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन केले होते.
पर्यावरणीय आव्हानांनी ग्रासलेल्या आणि ऊर्जेसाठी स्वच्छ तसेच अधिकाधिक शाश्वत ऊर्जा स्रोतांची त्वरेने आवश्यकता असलेल्या आजच्या जगात वाराणसी इथे उद्घाटन झालेली ही दुसरी तरंगती इंधन वायू भरणा पायाभूत सुविधा म्हणजे शाश्वत ऊर्जा पर्यायांच्या दिशेने टाकलेले एक व्यवहार्य आणि मजबूत पाऊल आहे, असे हरदीप सिंह पुरी म्हणाले.