नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वे प्रवासात बँग चोरी करणारा चोर पोलिसांनी गजाआड केला आहे. या चोरांकडून ८ लाख ६५ हजार ९१८ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक गुन्हेशाखा युनिट एकने हा तपास करुन चोराला पकडले आहे.
२५ नोव्हेंबर मुंबई येथील मेरी अल्याया भोपाळ येथून मुंबई येथे राणी कमलापती रेल्वे बोगी नं. ६ मधून प्रवास करत असतांना पहाटे ४.२५ वाजता अज्ञात चोरट्याने त्यांची शोल्डर पर्स व त्यामध्ये १४ तोळे सोन्याचे दागिने व एक रिअल कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल चोरी करून नेला होता. या चोरीची तक्रार त्यांनी नाशिकरोड रेल्वे पोलीस स्टेशन दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिकरोड रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी सदर अनोळखी इसमाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त करून व्हाट्सअप ग्रुपवर पाठविले होते. गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पो.हवा विशाल काठे यांना २५/११/२०२३ रोजी रात्री सदरचे सी. सी. फुटेजवरून संशयीत आरोपीची ओळख पटवली व बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदर संशयीत आरोपी हा भारत नगर येथे येणार आहे. सदरची माहीती त्यांनी वपोनिरी विजय ढमाळ यांना कळवली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि चेतन श्रीवंत, पो. हवा विशाल काठे, पो. हवा म्हसदे, भांड, गायकवाड, अमोल कोष्टी, चालक समाधान पवार यांनी भारतनगर येथे सापळा रचला. त्यानंतर आश्रम रौफ शेख वय १९ वर्षे रा. भारतगर वडाळा पाथर्डीरोड, नाशिक यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले.
या आरोपीला पकडल्यानतर त्यांच्याकडून गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यागे उडवाउडवीची उत्तरे दिली, त्याचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देऊन गुन्हयातील चोरी केलेले सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने व एक मोबाईल फोन असा एकुण ८ लाख ६५ हजार ९१८ रुपयाचा मुद्देमाल काढून दिला. या आरोपीला पुढील कारवाईसाठी नाशिकरोड रेल्वे पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.