विवेक उगलमुगले, नाशिक
दवाखान्यातील कंपाऊंडर ते महाविद्यालयात प्राध्यापक डॉक्टर असा अभिमानास्पद प्रवास करणारे प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. कवी, लेखक, स्तंभलेखक,कार्यकर्ता विद्यार्थी प्रिय प्राध्यापक अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला. राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेले बोऱ्हाडे यांना बा. य. परीटगुरुजी, दया पवार, विजय तेंडुलकर आदी मान्यवरांचा स्नेह लाभला.
सा. वा. ना. नाशिकचे पदाधिकारी आणि २००५ मध्ये संपन्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिकच्या आयोजनातून वाचक चळवळ समृद्ध करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान फार महत्वाचे ठरले. २०२२ मध्ये नाशिक येथे संपन्न पहिल्या शेकोटी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांचे काम ग्रामीण व उपेक्षितांच्या साहित्य चळवळीसाठी विशेष वाखाणले गेले होते.
एक शैलीदार लेखक आणि चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला नेहमीच प्रेरणादायी वाटत राहिले. शोध माणूसपणाचा या पुस्तकात मी त्यांच्यावर लिहिलेला लेख वाचक व सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल ! असे उदगार राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री राहिलेले स्व. बा. य.परीट गुरुजी यांनी काढले होते.
प्रा. शंकर बोऱ्हाडे यांच्या जाण्याने नाशिक जिल्ह्यातील या दोन्ही चळवळींची मोठी हानी झाली आहे. प्रा. डॉ. बोऱ्हाडे सरांच्या या अनपेक्षित जाण्याने साहित्यिक मित्र व्यथित झाले आहोत. बोऱ्हाडे सरांना भावपूर्ण आदरांजली आणि अक्षर सलाम.