इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावली. या पावासामुळे दोन जणांचा मृत्यू तर ५० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्षे व कांदा पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले. तर झाडेही उन्मळून पडली आहे.
नाशिक, इगतपुरी, देवळा, नांदगाव, येवला, मालेगाव, कळवण, देवळा, चांदवड पेठ तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. निफाड तालुक्यात प्राथमिक अहवालानुसार २५ गावांमध्ये नुकसान झालेले आहे. नांदगाव तालुक्यात काही ठिकाणी गारपीट तर निफाड व चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील ६ ते ७ गावात गारपीट झाली आहे.
या अवकाळी पावसामुळे सुरेश मुरलीधर ठाकरे (३५) रा.भाटंबा साल्हेर, ता. बागलाण, जि नाशिक शेतात काम करत असतांना वीज पडून मृत्यू झाला. तर सुभाष विठोबा मस्त्सगर (६५) रा पिंपळस, ता निफाड, जि नाशिक हे दुपारी शेतात काम करत असताना जोरदार गारपीटसह पावसाचा मारा लागल्यामुळे शेतातच त्यांचा मृत्यू झाला.
नाशिकमध्ये रविवारी दुपारी दीड वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा बदल झाला होता. त्यानंतर मनमाडलाही पाऊस पडला. शुक्रवारी सिन्नर येथेही अवकाळी पावासाने हजेरी लावली होती. याअगोदरच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त होती. ती खरी ठरली. या पावसामुळे काहींचे नुकसान तर काहींना फायदा होणार आहे. मनमाडला गारांचा पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. हा अवकाळी पाऊस मुसळधार होता. गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई असलेल्या या पावासाने काहीसा दिलासा दिला आहे.
जनावरांचा मृत्यू
मौजे फणस पाडा, ता. सुरगाणा, जि. नाशिक येथील शेतकरी बनशे देवाजी पवार यांच्या बैलावर चिंचपाडा येथे वीज पडून बैल मृत झाला.तर मौजे घोटी खू, ता इगतपुरी, जि नाशिक येथे शंकर निसरड यांचा गोठा पडला त्यात एका म्हशीचा मृत्यू झाला. या पावसामुळे ५० च्या आसपास जनावारांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.