नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध साहित्यिक, लेखक प्रा डॉ शंकर बोऱ्हाडे यांचे आज उपचारादरम्यान गुरुजी हॉस्पिटल येथे निधन झाले. डॉ. शंकर बोऱ्हाडे हे गेली ४० वर्षे साहित्य क्षेत्रात सक्रिय होते. त्यांचा अंत्यविधी सोमवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दसक, जेलरोड, नाशिकरोड येथील स्मशानभूमीत होईल. त्यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, एक मुलगा पत्रकार हर्षवर्धन, सून आणि नातू असा परिवार आहे.
बो-हाडे यांचे मरणगाथा (कवितासंग्रह), कडा आणि कंगोरे (व्यक्तिचित्र संग्रह) उजेडा आधीचा काळोख (ललित) देशभक्त शेषराव घाटगे (चरित्र) विडीची गोष्ट (उद्योगाचे चरित्र) शोध डॉ वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर ही संपादित पुस्तके प्रसिद्ध असून त्यांनी सार्वजनिक वाचनालयात विश्वस्त म्हणून काम केले आहे.
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता. मराठीचे प्राध्यापक असणारे डॉ.बोऱ्हाडे यांनी साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात आपले योगदान दिले. गेल्या वर्षी नाशिक मध्ये संपन्न झालेल्या पहिल्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अनेक नव्या साहित्यिकांना घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.