कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट कागदपत्राच्या आधारे जमीन खरेदी केल्याप्रकरणी पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेल्या कांतीलाल चोरडिया यांच्यासह चार जणांविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांचे कांतीलाल चोरडीया व्यावसायिक भागिदार असल्याचे बोलले जात आहे.
६० कोटीची २० हजार स्क्वेअरफूट जमीनीचे कुलमुखत्यारपत्र तयार करुन जमीन हडपल्याची तक्रार बेळगाव येथील मायाक्का चिंचली येथील जिंतेंद्र राचोजीराव जाधव यांनी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पुणे येथे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कांतीलाल चोरडिया यांचे सख्खे बंधू ईश्वरलाल चोरडिया यांच्याच बंगल्यावर शरद पवार व अजित पवार यांची बैठक झाली होती. त्यामुळे चोरडीया बंधु चर्चेत आले होते. पवार कुटुंबियांचे स्नेही असलेल्या कांतीलाल चोरडीयांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
यांच्याविरुध्द गुन्हा दाखल
चोरडिया यांच्यासह बाबासाहेब गणेश देसाई, बाबासाहेब पांडूरंग जाधव, नितीन श्रीकांत चौगुले व एस. बी. पाटील रा. शाहुपुरी, कोल्हापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही आहे तक्रार
जितेंद्र जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आजोबा सुबराव जाधव यांच्या मालकीची २० गुंठे जमीन कोल्हापुरातील शिवाजी पार्क येथे आहे. या जमिनीची सर्व कागदपत्रे जाधव कुटुंबियांकडे आहेत. पण, बाबासाहेब देसाई यांना कोणताही वटमुखत्यारपत्र दिले नसतांना ते असल्याचे भासवून १९८८ मध्ये संबधित मालमत्ता चोरडिया, चौगुले आणि जाधव यांना विकली.
माहिती अधिकारीमुळे प्रकरण उघड
या मालमत्तेचा वाद न्यायप्रविष्ट असतांना करवीरचे तत्कालीन सहा. दुय्यम निबंधक एस.बी. पाटील यांनी सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन नोव्हेंबर २००६ मध्ये दस्त नोंदणी केली. पाच महिन्यापूर्वी माहिती अधिकारात माहिती मागवल्यावर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला.