इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गोवा – आनंद सुरापूर दिग्दर्शित “रौतू की बेली” या हिंदी चित्रपटाचा आज गोव्यात ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भव्य प्रीमियर पार पडला. हा चित्रपट उत्तर भारतातील पर्वतीय भागातील रौतू की बेली या सुंदर शहरावर आधारित आहे. या शहरातील एका शाळेचा वॉर्डन मृत आढळल्यानंतर पोलीस निरीक्षक नेगी आपल्या सोबत प्रेक्षकांना देखील तपास मोहिमेवर घेऊन जातो.
पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रौतू की बेलीचा प्रमुख अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितले की, देशभरातील स्थानिक पार्श्वभूमी असलेल्या अस्सल कथा दाखवणाऱ्या चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळेल; जितके स्थानिक असतील, तितके जागतिक स्तरावर पोहचतील.चित्रपटातील भूमिका निवडण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाले की, मला केवळ एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिरेखांपुरतेच मर्यादित रहायचे नाही, व्यक्तिरेखांच्या वैविध्यतेला माझे प्राधान्य असेल.
कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तिरेखेचे जीवन जगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो जेणेकरुन त्या व्यक्तिरेखेचे आयुष्य आणि त्याचे स्वतःचे जीवन एकमेकात विलीन होईल. भविष्यात कोणती भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहात असे विचारले असता अभिनेते सिद्दीकी म्हणाले की “संधी मिळाली तर मला आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका साकारायला आवडेल”.
चित्रपट निर्मितीमागची प्रेरणा या प्रश्नाला उत्तर देताना दिग्दर्शक आनंद सुरापूर म्हणाले की, कथा सांगण्याची आवड आणि अनोख्या कल्पना हेच माझ्या प्रेरणेचे मुख्य स्त्रोत आहेत.झी स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रौतू की बेली चित्रपटाचे पटकथा लेखक शरिक पटेल म्हणाले की हा चित्रपट त्याच्या व्यक्तिरेखांच्या बाबतीत पठडीबाहेरचा आहे आणि हे एक हत्याकांडावरील अनोखा रहस्यपट आहे.