इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केरळमधील ‘कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’च्या कॅम्पस फेस्टदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात चार विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला, तर ५० हून अधिक जण जखमी झाले.
गायिका निखिता गांधी यांच्या कार्यक्रमापूर्वी अचानक आलेल्या पावसामुळे खुल्या सभेत चेंगराचेंगरी झाली. सभेसाठी एकच प्रवेश-एक्झिट गेट करण्यात आले होते. अचानक पाऊस पडला आणि विद्यार्थी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा अनेकजण एकावर एक पडू लागले. त्यात अनेक विद्यार्थी चिरडले.
अतुल थंबी, एन रुथा, सारा थॉमस आणि अल्विन थायकट्टुशेरी अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आणि त्यासाठी त्यांनी आधीचा नियोजित कार्यक्रम रद्द केला. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी जखमींवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.