नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापुर ,कडवा , मुकणे जलाशयातून जायकवाडी धरणासाठी आज सकाळी प्रथम ५०० क्यूसेक्सने विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्ग टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. हा विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाने आवाहन केले आहे. नदीपात्रातील चीज वस्तू ,साहित्य, मोटारी, वाहने इत्यादी पात्राचे बाहेर काढून घ्यावे. नदीप्रवाहात कुणीही प्रवेश करु नये. नदीपात्रा जवळील धार्मिक स्थळी तसेच पर्यटन स्थळी नागरिकांनी गर्दी करू नये. नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी विसर्गाबद्दल माहिती दिली आहे.
अगोदर कायदा सुव्यस्थेचे कारण देत सरकारने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास तूर्त स्थगिती दिल्याची चर्चा असतांनाच शुक्रवारी दारणा धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यात आले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दारणा धरणातून १०० क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले.
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून हळूहळू विसर्ग वाढवण्यात येणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
शासन आदेशानुसार मुळा प्रकल्पातून २.१०, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे) प्रकल्पातून ३.३६, गंगापूर धरणातून (कश्यपी, गोदावरी), ०.५, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४३ टीएमसी असे एकूण ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे. पाणी सोडण्याच्या विरोधात नगर-नाशिक जिल्ह्यातील कारखाने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली; परंतु तिथे त्यांना दिलासा न मिळाल्याने आता समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडले आहे. ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला, तरीही प्रत्यक्षात पाच टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात पोहोचणार आहे. त्यामुळे ३५ टक्के पाणी वाया जाणार आहे. पाच टीएमसी पाणी आल्यावर जायकवाडी धरणाची पाणीपातळी ४४ ते ४५ टक्क्यांपर्यंत पाणीपातळी वाढणार आहे.