मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीत कर्मचा-यांशी संबधीत अनेक विषयांवर सकारत्मक चर्चा झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी केंद्राप्रमाणे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे सांगितले.
सध्या राज्य शासन सेवेतील वर्ग अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे; तर संवर्ग ड मधील कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. केंद्रीय कर्मचारी, राज्य शासनातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी, चतुर्थ सेवेतील कर्मचारी, तसेच २५ घटक राज्यांमध्ये सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेत निवृत्ती वयात समानता आणण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या बैठकीत सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात चर्चा झाली. सुबोधकुमार समितीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक लाभ, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासह नवीन पेन्शनधारकांना निवृत्तीवेतन देणे याबाबतही लक्ष वेधण्यात आल्याचे कुलथे यांनी सांगितले.