इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिंडोरी तालुक्यातील बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नाशिकमधून फरार झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच पीडित मुलीचा मृतदेह तिच्या घराजवळीलच एका विहीरीत आज आढळून आला आहे. मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फरार आरोपीचा अजून पोलिस शोध घेत असतांना ही घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांना तुरी देऊन फरार झालेल्या आरोपीचे नाव उमेश खादवे (३५) असून तो पिंपळनेर गावातील ग्रामपंयात सदस्य आहे. एका वीस वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर २७ सप्टेंबरला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायलयात हजर केले. न्यायालयाने त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दिंडोरी पोलिसांनी त्याला २८ सप्टेंबरला त्र्यंबकेश्वरल घेऊन गेले. त्र्यंबकेश्वरहून परत येत असतांना त्याने नाशिक शहरातील गंगापूर रोडवर लघुशंकेच्या बहाण्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन पळ काढला होता.
एकीकडे पोलिस फरार आरोपीचा शोध घेत असतांना या घटनेत आज पीडित मुलींच्या कुटुंबियांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिंडोरी पोलिसांकडे दिली. त्यानंतर तीचा मृतदेह घरा शेजारी सापडला. दरम्यान या घटनेत आरोपीच्या घराजवळ मी आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा मजकूर लिहिलेला एक कपडाही आढळून आल्याचे बोलले जात आहे. या सर्व घटनेचा दिंडोरी पोलीस आणि सरकारवाडा पोलीस अधिक तपास करत असून, त्यातून या घटनेचा उलगडा होणार आहे.