नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कायदा सुव्यस्थेचे कारण देत सरकारने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास तूर्त स्थगिती दिल्याची चर्चा असतांनाच आज दारणा धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दारणा धरणातून १०० क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले.
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून हळूहळू विसर्ग वाढवण्यात येणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. पाणी सोडण्याची पूर्वतयारी म्हणून नदीकाठावरील डोंगळे (पाइप), मोटर्स काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित केला आहे. पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
शासन आदेशानुसार मुळा प्रकल्पातून २.१०, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे) प्रकल्पातून ३.३६, गंगापूर धरणातून (कश्यपी, गोदावरी), ०.५, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४३ टीएमसी असे एकूण ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे. पाणी सोडण्याच्या विरोधात नगर-नाशिक जिल्ह्यातील कारखाने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली; परंतु तिथे त्यांना दिलासा न मिळाल्याने आता समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडले आहे. ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला, तरीही प्रत्यक्षात पाच टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात पोहोचणार आहे. त्यामुळे ३५ टक्के पाणी वाया जाणार आहे. पाच टीएमसी पाणी आल्यावर जायकवाडी धरणाची पाणीपातळी ४४ ते ४५ टक्क्यांपर्यंत पाणीपातळी वाढणार आहे.