नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत सरकार मार्फत देण्यात येणारा आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील सर्वोच्च असा राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार – २०२३ या पुरस्कारसाठी राज्यातील एकमेव नाशिक येथील इंडिजिनस फार्मचे प्रवर्तक सटाणा येथील प्रगतशील शेतकरी इंजिनिअर राहुल मनोहर खैरनार यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारामुळे यंदा महाराष्ट्र राज्यातील राहुल खैरनार हे एकमेव गोपालक ठरले आहेत.
देशी गौसंवर्धन क्षेत्रासाठी देण्यात येणारा तृतीय पुरस्कार यंदा गुजरात आणि महाराष्ट्रातील गोपालकांना मिळाले असून दोन लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रथम पुरस्कार करनाल हरियाणा येथील गोपालक रामसिंह तर द्वितीय पुरस्कार सूरत येथील गो पालकनिलेश मगनभाई अहिर तृतीय पुरस्कार विभागून वलसाड येथील गोपालक श्रीमती वृंदा सिद्धार्थ शाह आणि नाशिक येथील गोपालक राहुल मनोहर खैरनार यांना जाहीर झाला आहे.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने प्रदेशअध्यक्ष गणेश भेगडे आणि प्रदेश सरचिटणीस रवींद्र अमृतकर यांनी राहुल खैरनार यांचे अभिनंदन करत शेतकऱ्यांना गौकेंद्रित शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी या सन्मानाचा निश्चितच उपयोग होईल असे शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
संपूर्ण भारतातुन दरवर्षी देशी गोवंश मध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या तीन जणांना सदर पुरस्कार भारत सरकार कडून प्रदान करण्यात येतो. या आधी प्रथम क्रमांकाचा हाच पुरस्कार सटाणा येथील तरसाळी गांवच्या अनिरुद्ध पाटील यांना केंद्र सरकारने दिला होता.
सदर पुरस्कार ना. पुरुषोत्तमजी रुपाला केंद्रीय मंत्री, पशुसंवर्धन विभाग, भारत सरकार यांच्या हस्ते गुवाहाटी, आसाम येथे दिनांक २६ नोव्हेबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल राहुल खैरनार यांनी केंद्र सरकारचे आभार मानले असून हा पुरस्कार वैयक्तिक माझा नसून देशी गोसवर्धन करणाऱ्या भारतातील सर्व गोपालकांसाठी व त्यांच्या कार्यासाठी समर्पित आहे असे प्रतिपादन राहुल खैरनार यांनी केले.