नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील नवउद्योजक आणि नाविण्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक कौशल्ये व मार्गदर्शन उपलब्ध होण्यासाठी 28 नाव्हेंबर 2023 रोजी अशोका बिझनेस स्कूल,3, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, योगक्षम, एलआयसी कॉलनी राणे नगर, नाशिक -422009 येथे सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या कालावधीत District Outreach Programme चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पदवीधर युवा, महिला, कुशल तरूण-तरूणी, नव उद्योजक, स्टार्टअप्स, इनक्युबेटर्स, नुकतेच पदवीधर झालेले विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजक यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र, नाशिक चे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी केले आहे.
शासनाने 7 मार्च 2019 रोजी घोषित केलेल्या औद्योगिक धोरण -2019 अंतर्गत नवउद्योजक व नाविण्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करून पूरक वातावरण निर्मितीचे प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या 6 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यात Business Accelerator Programme/ Incubation Centre स्थापन करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठ इथाका, न्युयॉर्क, U.S.A व XED (कॉर्नोलचे आशियाई भागीदार) यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र शाासनाने कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने महा-60 कार्यक्रम Business Accelerator Programme सुरू केला असून यात दरवर्षी किमान 60 यशस्वी नवउद्योजकांना प्रशिक्षित केले जात आहे.
आयोजित कार्यशाळेत कॉर्नेल-60 कार्यक्रमाबद्दलचे सादरीकरण, कॉर्नेल महा-60 प्रशिक्षणार्थ्यांचे अनुभव कथन व मार्गदर्शन यासह उद्योग विभागाच्या योजनांचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. IDBI मार्फत IDBI Seed Fund बाबत त्याचप्रमाणे SIDBI मार्फत Startup Finance Schemes चे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध विषयांवर तज्ज्ञ, एमएसएमई बाबत मार्गदर्शन करणार असल्याचे जिल्हा उद्योग केंद्र, नाशिकचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी कळविले आहे.