नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागील तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी परतीचा पाऊस समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांमधून ऑगस्ट अखेर पाणी पुरेल याप्रमाणे नियोजन करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवहन करीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेत शेतकऱ्यांना विचारात घेवूनच सिंचन आवर्तनाचे नियोजन करावे. अशा सूचना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, नितिन पवार, डॉ. राहुल आहेर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य, पाणी वापर संस्थांचे अधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले, भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता शेतकरी व नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. धरण समूह व पाणी प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठी लक्षात घेता शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन देण्याच्या दृष्टीने येत्या दोन दिवसांत लोकप्रतिनिधी, अधिकारी व शेतकरी यांची समिती गठीत करून पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे आवर्तन सोडतांना पाण्याचा अपव्यय होणार नाही यादृष्टीने ज्या ठिकाणी कालव्यांची दुरूस्ती आवश्यक आहे ती तातडीने करण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी चणकापूर प्रकल्प, पालखेड प्रकल्प, ओझरखेड प्रकल्प, कडवा प्रकल्प, गंगापूर प्रकल्प यांच्यातील उपलब्ध पाणीसाठा व त्यांचे नियोजन याबाबतचा आढावा घेतला. बैठकीत लोकप्रतिनिधींनी पाण्याबाबत मौलिक सूचना केल्या. त्याअनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेवून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणेबाबत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचित केले.