इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – राज्य सरकारच्या वतीने ब्रिटनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यासाठी लंडनला रवाना झाले असून १६ नोव्हेंबरला वाघनखे भारतात दाखल होतील. पण ही वाघनखे शिवरायांची नाहीत, असा दावा इतिहासकारांनी केल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष म्हणून राज्य सरकारने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. यातच अफजलखानाचा वध करण्यासाठी जी वाघनखे वापरली गेली, ती ब्रिटनच्या संग्रहालयातून भारतात आणण्यासाठीही राज्य सरकारने प्रयत्न केले. आता तो क्षण जवळ आला असताना इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी वेगळाच दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये शिवरायांची ही वाघनख ठेवण्यात आली आहेत. तर याच वस्तू संग्रहालयासोबत ३ ऑक्टोबर रोजी करार करण्यात येईल. त्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी ही वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल.
पण ही शिवरायांची वाघनखे नाहीतच असे सावंत यांचे म्हणणे आहे. ‘शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही परत आणत आहोत, ही जी काही कथा रचली जातेय ते साफ खोटे आहे. इतिहासशास्त्राच्या पुराव्याच्या कसोटीवर हे टिकत नाही. शासनाने खोटे बोलू नये,’ असे सावंत म्हणतात. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी ती वाघनखे शिवरायांची नाहीत, असा दावा केला आहे. सावंत यांनी म्हटल्यानुसार, ‘शिवरायांनी अफजलखानाचा वध करताना जे शस्त्र वापरले ते कुठे आहे याची स्पष्टता १९१९ पर्यंत होती. कारण हे शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होते. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत.
पण आता जी वाघनखे आणली जात आहेत, ती शिवरायांनी अफजलखान वधाच्या वेळी वापरलेली वाघनखं नाहीत. जर १९१९ पर्यंत ही वाघनखे साताऱ्यात होती, अशा नोंदी आहेत. तर मग १९१९ च्या आधी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये जमा झालेली वाघनखे शिवरायांची असूच शकत नाहीत,’ असा दावा त्यांनी केला आहे.
स्पष्ट नोंदी आहेत
‘व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयात १९१९ च्या आधीपासून ही वाघनखे आहेत. इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सन १८१८ मध्ये सातारच्या गादीवर प्रतापसिंह महाराजांना बसवले. त्या महाराजांनी जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला ही वाघनखे भेट म्हणून दिली होती. कनिंगहॅम याने मराठ्यांच्या इतिहासाबाद्दल लिखाण केले आहे आणि त्यावेळी तो साताऱ्याचा रेसिडेंट देखील होता. तसेच प्रतापसिंह महाराज आणि त्याची चांगली मैत्री देखील होती. ती वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयात ग्रँट डफ यांच्या नातवाने भेट दिली. त्याबाबतच्या स्पष्ट नोंदी देखील या वस्तूसंग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये आहेत. त्यामुळे ती वाघनखे शिवाजी महाराजांनी वापरलेलीच आहेत, असा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही, असा दावा सावंत यांनी केला आहे.