संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अपत्यप्राप्ती संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात संगमनेर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी इंदोरीकर महाराजांनी अपत्यप्राप्ती संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्हा करण्यात आला होता. संगमनेर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने जामीनअर्ज सुनावणीसाठी २४ तारीख दिली होती; मात्र सुनावणीच्या एक दिवस आधीच इंदोरीकर महाराज न्यायालयात हजर झाले. वकिलांनी न्यायालयाला विनंती केल्याने त्यांना २० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरुद्ध संगमनेर येथील न्यायालयात केस सुरू आहे. न्यायालयाने जामीनाच्या निर्णयासाठी २४ नोव्हेंबर तारीख दिली होती. तथापि २४ तारखेला महाराजांचे तीन मोठे कार्यक्रम आहेत. ते रद्द करण्याजोगे नव्हते. त्यामुळे गुरुवारी महाराजांनी सकाळचे कार्यक्रम रद्द केले आणि आज जामीन देता येईल का या संदर्भात विनंती केली. त्यावरून न्यायालयाने २० हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर इंदोरीकरांना जामीन मंजूर केला.