इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर मशिदी पाडल्या जात आहेत किंवा त्यात बदल करण्यात येत आहेत. चीनमधील सुमारे दोन कोटी लोक इस्लामला मानतात. ‘ह्युमन राइट्स वॉच’ने म्हटले आहे, की चीनने मुस्लिम प्रार्थनास्थळे पाडणे हा इस्लामला दडपण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले पाहिजे.
चीनी कायदा लोकांना अधिकृतपणे मंजूर केलेल्या जागेवर केवळ पाच अधिकृत मान्यताप्राप्त धर्मांचे पालन करण्याची परवानगी देतो. ‘ह्युमन राइटस् वॉच’च्या अहवालानुसार, २०१६ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनमधील धर्मांचे ‘सिनिकायझेशन’ करण्यावर भर दिला होता. म्हणजेच, त्यांनी कोणत्याही धर्माचा चीनी श्रद्धा आणि परंपरांशी जबरदस्तीने संबंध जोडण्याचा सल्ला दिला, तेव्हापासून चीनमध्ये धर्मावरील सरकारचे नियंत्रण अधिक मजबूत झाले. २०१८ मध्ये, चीन सरकारने इस्लामिक साइट्सवर कडक नियंत्रण ठेवण्याचे आदेश सरकारी अधिकाऱ्यानां दिले होते.
जास्तीत जास्त इस्लामिक प्रार्थनास्थळे पाडून बांधकामासाठी किमान परवानगी देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. अहवालानुसार, चीनमधील शिनजियांगनंतर सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या निंग्झिया आणि गान्सू या उत्तरेकडील भागातील शेकडो मशिदी चीनी अधिकाऱ्यांनी बंद केल्या आहेत किंवा त्यात बदल केले आहेत. ‘ह्युमन राइट्स वॉच’च्या संशोधकांनी सांगितले, की चीन सरकार निंग्झिया स्वायत्त प्रदेश आणि गान्सू प्रांतातील मशिदींची संख्या लक्षणीयरीत्या कमी करत आहे. चीनी कम्युनिस्ट पक्षाने चीनच्या धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांवर दीर्घकाळ घट्ट पकड ठेवली आहे.