दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे तालुक्याचे माजी गटविकास अधिकारी तथा कादवा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन कृषी अधिकारी उध्दव पांडुरंग मोरे (मोरे आण्णा)यांना सन २०१९/२० साठीचा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिंडोरी तालुक्यात १९६० साली ग्रामसेवक पदापासून सेवेची सुरुवात करत या कर्मभूमीशी एकरूप होऊन आदिवासी वाडी वस्ती वर प्रसंगी पायी जाऊन आदिवासी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे बाळकडू देण्यात मोरे यांचे मोलाची योगदान आहे. तसेच कादवा सहकारी साखर कारखान्यावर कार्यरत असताना कादवाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न त्यांनी बघत कामकाज केले.
सरकारी नोकरी ही जनसेवा आहे. या विचाराने भारावून त्यांनी ग्रामसेवक ते गटविकास अधिकारी म्हणून काम केले. तालुक्याच्या स्थित्यंतरासाठी अविरत जनप्रबोधनही त्यांनी केले. वयाच्या ८५ व्या वर्षी समाज सेवेचा वसा घेतलेल्या मोरे यांचे जनसेवेचे कार्य सुरु आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्य स्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर केला आहे.याब द्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे