पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल हे सांगता येत नाही. आता झोप मोडली म्हणून एखादा फारतर चिडेल.. काही तरी बोलेल पण, एकाने थेट झोप मोड केल्यामुळे खूनच केला आहे. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही धक्कादायक घटना घडली. येथे झोपमोड केल्यामुळे भाडेकरूने घरमालकाची हत्या केली.
आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून भाडेकरु संतोष राजेंद्र धोत्रे याला गजाआड केले आहे. दादा ज्ञानदेव घुले असे घरमालकाचे नाव आहे. घुले यांच्या घरात संतोष राजेंद्र धोत्रे भाडेकरुन म्हणून राहत होता. त्यांनेच घरमालकाचा खून केल्याचे आता उघड झाले. त्यांनी त्यामागील कारणही सांगितले त्यामुळे पोलिसांना सुध्दा मोठा धक्का बसला.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी संतोष धोत्रे दारू पिल्यानंतर घरात झोपायला गेला. त्या वेळी दादा घुले यांनी त्यांच्या घरासमोर दुचाकीचा हॉर्न जोरजोराने वाजवला. त्याचा धोत्रे यांना राग आला. आपली झोपमोड केल्यामुळे धोत्रे याने अगोदर घरमालक असलेल्या दादा घुले यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडवून त्यांचा खून केला.