इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – राष्ट्रवादीच्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगात वाद सुरु असतांना आता संसदेतही सदस्यत्व रद्द करण्याची मागणीवरुन दोन्ही गट एकमेकांना भिडले आहे. दोन्ही गटांनी एकमेकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका दाखल केल्यामुळे हा वाद चांगलाच रंगला आहे. विशेष म्हणजे या याचिका दाखल करतांना काही नेत्यांची नावे वगळण्यात आल्यामुळे त्यावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
शरद पवार गटाकडून अगोदर लोकसभा अध्यक्षांना खासदार सुनील तटकरे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसापूर्वी राज्यसभा सभापतींची भेट घेऊन राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर अजित पवार गटाने सुध्दा लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांचे नाव वगळून श्रीनिवास पाटील व फैजल मोहम्मद यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. त्याचबरोबर राज्यसभेत शरद पवार यांचे नाव वगळून वंदना चव्हाण व फैजिया खान यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाने उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे नाव वगळली होती. तीच भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. आता त्यांची भूमिकेवर अध्यक्ष व सभापती काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे आहे.