मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय आवास दिनानिमित्त ३१ मार्च २०२४ पर्यंत “महा आवास अभियान २०२३-२४ राज्यभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महा आवास अभियान पुरस्कार वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत २३ नोव्हेंबर २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.
राज्यात राबविण्यात येणाऱ्या “महा आवास अभियान २०२३-२४ या अभियानामुळे १० लाख गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
“सर्वांसाठी घरे-२०२४ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढविणे हा या अभियानाचा हेतू आहे.
या अभियान कालावधीत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरित करणे, सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, बहुमजली इमारती, गृहसंकुले व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे, डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे, शासकीय योजनांशी कृतीसंगम (Convergence) करणे, नावीन्यपूर्ण उपक्रम (Innovations / Best Practices) राबविणे, इ. १० उपक्रम राबविण्यात येत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी केले. विविध विभागाचे मंत्री, सचिव व राज्यस्तरीय वरीष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.