नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांच्या हस्ते २०२२-२३ या राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्काराने सन्मान करण्यात आला. २२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यात बालकांचा सर्वांगीण विकास, बाल हक्क संरक्षण त्यांची सुरक्षा, कुपोषण,आरोग्य या विषयावर काम करणाऱ्या यंत्रणा व यंत्रणेतील अधिकारी यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल बाल हक्क संरक्षण आयोग , महिला व बाल विकास विभाग, सी.सी.डी.टी. संस्था, युनिसेफ यांचे संयुक्त विद्यमाने बालस्नेही पुरस्कार हा देण्यात येतो.
नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने महिला व बाल विकास विभागासह शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग यांच्या समन्वयातुन आयआयटी मुंबई या संस्थेच्या मदतीने स्तनपान महत्व व पुरक पोषण आहार हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. SAM/ MAM कुपोषण व्यवस्थापन अंतर्गत कुपोषित बालक व पालक यांचा किलबिल मेळावा ,कुपोषित बालकांना अतिरिक्त पोषण आहार किट वाटप ,बाला अंगणवाडी अश्या विविध उपक्रमामुळे जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न हा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
शिक्षण विभागाच्या वतीने १२८ मॉडेल स्कूल या तयार करण्यात येत असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थीनीना कराटे प्रशिक्षण देण्यात येत आहे. गत वर्षापासून जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुपर ५० या उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नीट, जेईई, जेईई ऍडव्हान्स, सीइटी या परीक्षांसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
उमेद अंतर्गत राखी महोत्सव व महिला बचत गट सक्षमीकरण,महिलांसाठी महिला स्नेही ग्रामपंचायत असे उपक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाअंतर्गत आभा कार्ड ,गोल्डन कार्ड ,महिला व बालकांची आरोग्य तपासणी,समाज कल्याण विभागा अंतर्गत दिव्यांग मुलांची तपासणी व पुनर्वसन,पशुसंवर्धन विभागा मार्फत कुपोषित बालकांच्या पालकांना कोंबडी वाटप असेउपक्रम सर्व जिल्हा परिषद विभागामध्ये समन्वय साधून महिला व बालकांच्या सक्षमीकरनासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रताप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांच्यासह नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रताप पाटील यांनी दिली.