नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी खोऱ्यातील नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या बाबत कार्यकारी संचालक गोदावरी खोरे विकास महामंडळ यांनी दिलेल्या आदेशाचे फेरनियोजन करून त्यातून गंगापूर धरण वगळण्याची आमदार देवयानी फरांदे यांची मागणी
गोदावरी खोऱ्यातील नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडणे बाबत कार्यकारी संचालक गोदावरी खोरे विकास महामंडळ, औरंगाबाद यांनी आदेश दिलेले आहे. या आदेशाचे फेरनियोजन करून त्यातून गंगापूर धरण वगळण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्याकडे केलेली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात आमदार देवयानी फरांदे यांनी गोदावरी खोऱ्यातील नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडणे बाबत आदेश देताना कार्यकारी संचालक गोदावरी खोरे विकास महामंडळ औरंगाबाद यांनी नाशिक गंगापूर धरण येथील सद्यस्थितीचा विचार केला नसल्याची तक्रार करताना याबाबत फेरनियोजन करण्याची आवश्यकता असल्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केलेली आहे.
याबाबत मुद्दे उपस्थित करताना गंगापूर धरणातील पाणी हे ७० टक्के पिण्यासाठी आरक्षित आहे उर्वरित पाणी हे द्राक्षबागांसाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देण्यात येते. गंगापूर धरणातून पाणी मराठवाड्यासाठी सोडल्यास शेतकऱ्यांना तिसरे आवर्तन देणे शक्य होणार नाही. त्यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होणार असल्याची बाब त्यांनी उपमुख्यमंत्री व प्रधान सचिव यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच गंगापूर धरणाच्या बाबत देण्यात आलेली आकडेवारी चुकीची असल्याचे स्पष्ट करताना गंगापूर धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. याबाबत सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे देण्यात आलेली आकडेवारी फुगीर असून ती वास्तविकतेला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.
तसेच गंगापूर धरणात जायकवाडी प्रमाणे मृतसाचा धरलेला नसल्यामुळे तळातील पाणी उचलताच येत नाही त्यामुळे या मृत्यूचा त्याचा विचार केल्यास दर्शवण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा कमी पाणी हे वाटपासाठी उपलब्ध आहे. तसेच गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर वहन हानी होऊन अत्यल्प पाणी मराठवाड्याला पोहोचणार आहे किंवा पाणी देखील पोहोचणार नाही. त्यामुळे गंगापूर धरणातून पाणी सोडल्यास मराठवाड्याचा फायदा होणार नाहीच, परंतु नाशिक जिल्ह्याचे मात्र कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. ही बाब त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या निदर्शनास आणून दिली.
दारणा धरणातून नाशिक महानगरपालिकेला पाणी उचलता येत नाही त्यामुळे गंगापूर धरणातून पाणी सोडणे ऐवजी ०.५ अतिरिक्त पाणी दारणा धरणातून सोडल्यास त्यास हरकत राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत लवकरात लवकर भेद नियोजन करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रधान सचिव दीपक कपूर यांच्याकडे केलेली आहे.