नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे विद्युत उपकरणांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या प्रियंका पार्कमध्ये महावितरणने गुरुवारी नवीन केबल टाकली. पाठपुराव्याची दखल घेतल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्यांचे आभार मानले आहे.
गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करताना तुटलेली विद्युत केबल न जोडताच खड्डे बुजवून टाकण्यात आले आहेत. पाणी गेले किंवा वाहनांच्या वर्दळीमुळे त्याच ठिकाणी आणखी केबल तुटल्यानंतर अचानक विद्युत दाब वाढतो. घरातील बल्बचे स्फोट होवून नुकसान होते. प्रभाग २४ मधील प्रियंका पार्क भागात रविवारी पहाटे तीन ते पाच दरम्यान घरांमध्ये बल्बचे स्फोट झाले. टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप यासह विद्युत उपकरणांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नागरिक भयभीत झाले होते. २४ तास विद्युत पुरवठा खंडीत होता. खोदाई करणार्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली. अशी घटना पुन्हा झाल्यास महापालिका व वीज वितरण कंपनीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.
बुधवारी वीज वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण वट्टमवार, उपअभियंता विशाल मोरे, तंत्रज्ञ किशोर वाघ, लाईनमन गोकुळ सोनवणे यांनी रहिवाशांची भेट घेतली. नुकसानीची पाहणी करून माहिती घेतली. आज गुरुवारी नवीन केबल टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या सर्वांचे बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, बाबुराव चौधरी, डॉ. सुनील चौधरी, मुकुंद रनाळकर, भूषण देशमुख, दिनेश खळदकर, पल्लवी रनाळकर, सविता महाले, कुसुम खळदकर, सोनल आहिरे, सोनाली चौधरी, अनुराधा रनाळकर आदींनी आभार मानले.









