जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करा; परंतु आत्महत्येचा मार्ग चोखाळू नका, असे आवाहन वारंवार करण्यात येत असले, तरी युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आजही जालना जिह्यातील एका युवकाने पेटवून घेतले. त्याला वाचवण्यासाठी धावलेली आईही गंभीररीत्या भाजली आहे. दोघांनाही छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील सुरेश गणेश जाधव याने बुधवारी सकाळी अचानक मराठा आरक्षणासाठी जाळून घेतले. त्यात तो पन्नास टक्क्यांहून अधिक भाजला आहे. मुलाने पेटवून घेतल्याचे पाहताच त्याची आई त्याला वाचवण्यासाठी धावली. त्यात त्याही भाजल्या. सूरज हा १७ वर्षीय युवक गेल्या तीन सहा महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय होता. आश्वासन देऊनही सरकार आरक्षण देत नसल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे सूरज बारावीनंतर आयटीआयचे शिक्षण घेत होता. गरिबीमुळे त्याला शैक्षणिक शुल्कही वेळेवर भरता येत नव्हते. आर्थिक परिस्थिती आणखी हलाखीची झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. माझ्या मुलाचे काही बरेवाईट झाले, तर त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्याची आई मंगल जाधव यांनी दिला.