नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -औष्णिक ऊर्जा क्षमता वाढीचा आढावा घेण्यासाठी आणि उद्योगांना येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी सुविधा देण्यासाठी केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री आर. के.सिंग यांनी ऊर्जा क्षेत्रातील भागधारकांशी २१ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे संबंधित भागधारकांशी संवाद साधला. ऊर्जा मंत्रालय,राज्य सरकारे, केंद्रीय विद्युत प्राधिकरण,यातील अधिकारी तसेच मंत्रालयांतर्गत येणारे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम(PSUs) उदाहरणार्थ राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ ,(NTPC), ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ (REC), पावर फायनान्स काॅरपोरेशन(PFC), भेल(BHEL)यांचे प्रतिनिधी याशिवाय स्वतंत्र ऊर्जा उत्पादक आणि विक्रेत्यांसह उद्योगातील सर्व हितसंबंधित या बैठकीत सहभागी झाले होते.
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs) आणि सर्व उद्योगांतील भागधारकांना संबोधित करताना, उर्जा मंत्र्यांनी सांगितले; तसेच २०३१-३२ पर्यंत ८० गीगा वॅट (GW) औष्णिक उर्जा क्षमता गाठण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल आणि देशाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते का महत्त्वाचे आहे याबद्दल त्यांनी सर्वांना माहिती दिली.“अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीमुळे देशातील ऊर्जेची मागणी अनेक पटींनी वाढली आहे. भारताला त्याच्या आर्थिक विकासासाठी 24×7 ऊर्जेची उपलब्धता आवश्यक आहे; आणि आम्ही आमच्या विकासासाठी ऊर्जेच्या उपलब्धतेशी तडजोड करणार नाही. ही उर्जा केवळ अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे प्राप्त केली जाऊ शकत नाही.
ज्या राज्यांची स्वत:ची औष्णिक उर्जा निर्मिती केंद्र आहेत,त्यांनी ती व्यवस्थित राखली पाहिजेत आणि कार्यक्षम ठेवली पाहिजेत. औष्णिक प्रकल्पांचे कोणतेही नूतनीकरण, आधुनिकीकरण किंवा त्यांचे आयुष्य वाढविण्यासाठी वेळेवर प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सिंह म्हणाले.“तुम्ही तुमची औष्णिक क्षमता राखली नाहीत आणि त्याऐवजी आमच्याकडे केंद्रीय राखीव निधीतून ऊर्जा मिळण्याची अपेक्षा करत असाल, तर तसे होणार नाही. जी राज्ये त्यांची क्षमता राखून आहेत आणि कार्यरत आहेत त्यांनाच आम्ही अतिरिक्त मदतीची जोड देऊ. तसेच, ज्यांना आपली क्षमता वाढवायची आहे ते तसेही करू शकतात.”असेही ते यावेळी म्हणाले
उर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री यांनी उद्योगांना औष्णिक उर्जा निर्मिती क्षमतेच्या वाढीसाठी नियोजन करण्याचे आवाहन केले.
उर्जेच्या गरजा लक्षात घेता, अशा उद्योगांना पुढील ५-७ वर्षे औष्णिक ऊर्जा क्षमता वाढीसाठी मागणी कायम राहील. सिंह म्हणाले की, ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक वातावरण उत्तम आहे. त्यांनी उद्योगांना मागणी पूर्ण करून उत्पादन क्षमता वाढवण्याचा सल्ला दिला, जेणेकरून ते अधिकाधिक क्षमतेसाठी सज्ज राहतील. यावेळी विक्रेते आणि कंत्राटदारांना त्यांच्या समस्या आणि सूचना सादर करण्यास सांगितले; जेणेकरुन त्यावर व्यवहार्य तोडगा काढता येईल.